अवकाश, संरक्षण उत्पादन क्षेत्राला मिळणार गती

Foto
अवकाश, संरक्षण उत्पादन क्षेत्राला मिळणार गती
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : राज्यात विकसित होणार्‍या तीन संरक्षण कॉरिडॉरमध्ये छत्रपती संभाजीनगरचाही समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या नवीन उद्योग धोरणात पुण्याला आर्थिक विकासाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने सरकारने पाऊल उचलले आहे. यासाठी तीन संरक्षण कॉरिडॉर विकसित केले जाणार आहे. त्यात पुणेसह अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश करण्यात आला आहे.
शासनाने नवीन उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर केले आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, सावनेर आणि नाशिक, धुळे हे आणखी दोन कॉरिडॉर आहेत. विमानतळ, बंदर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने हे कॉरिडॉर निश्चित करण्यात आले आहेत. त्यातून अवकाश व संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती मिळणार आहे. तथापि, उत्पादनांची चाचणी आणि गुणवत्ता आणि प्रमाणन याबाबत छत्रपती संभाजीनगर पात्र ठरले आहे. 

या कॉरिडॉरमुळे उत्पादनांच्या चाचणीसाठी वेळ कमी लागणार आहे. तसेच याअंतर्गत वेतन अनुदान, करसवलती, संशोधन व विकास, करकपात आणि भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन या गोष्टी शासन करणार आहे.
इनोव्हेशन आणि इनोव्हेशन हब
राज्यात उद्योजकतेमध्ये जागतिक स्तरावर आघाडी गाठण्यासाठी नवोपक्रम व नवोन्मेष हब स्थापन केले जाणार आहेत. ब्लॉकचेन, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि स्मार्ट मॅन्युफॅक्करिंग यांसारख्या आघाडीच्या क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप), इनक्युबेटर, अ‍ॅक्सिलरेटर आणि संशोधन व विकास केंद्रांना यातून पाठबळ दिले जाणार आहे. या हबमध्ये नवोन्मेष प्रयोगशाळा, टेक पार्क आणि कार्यालयीन जागा सहकार्य यांचा समावेश राहील.